मावळ तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले आहे.
‘व्हॅलेन्टाइन डे’निमित्त तीन दिवसांत लाखो फुलांची निर्यातदर्जेदार आणि निर्यातक्षम गुलाब फुलांचे उत्पादन करणाऱ्या मावळ तालुक्यातून यंदा ‘व्हॅलेन्टाइन डे’साठी तब्बल सत्तर ते पंचाहत्तर लाख गुलाब फुले परदेशी बाजारपेठेत जाण्याची तयारी पूर्ण झाली असून पुढील दोन ते तीन दिवसांत या फुलांची निर्यात होणार आहे. त्यात ‘टॉप सिक्रेट’ नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी आहे. मावळ तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाउसच्या माध्यमातून गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले आहे.
मावळातील अडीचशे हेक्टर क्षेत्रापैकी दीडशे ते पावणेदोनशे हेक्टर क्षेत्रातील फुले परदेशी बाजारात ‘व्हॅलेटाइन डे’साठी पाठवली जातात. यंदा सत्तर ते पंचाहत्तर लाख फुलांची निर्यात होईल, असा अंदाज पवना फूल उत्पादक संघाचे वितरण प्रमुख मुकुंद ठाकर यांनी ‘लोकसत्ताशी’ बोलताना व्यक्त केला. ठाकर म्हणाले, पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून वीस एकर क्षेत्रात सहा लाख गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यात आले असून त्यापैकी पाच लाख फुले विदेशी बाजारात निर्यात करण्यात आली आहेत. ही फुले २६ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान पाठवली जात असल्यामुळे सध्या सध्या सर्वच पॉलिहाउसमध्ये गुलाबफुलांच्या पॅकिंगची धावपळ सुरू आहे.
टॉप सिक्रेट (लाल रंग), गोल्डस्टाईक (पिवळा), ट्रॉपिकल अॅमेझॉन (नारंगी) ही फुले सध्या प्रामुख्याने परदेशात पाठवली जात आहेत. मावळातून मुख्यत: जपान व हॉलंड येथे फुले जात असून दिल्ली या मुख्य बाजारपेठेसह पुणे मुंबई, इंदूर, सुरत, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, हैदाबाद आणि गोवा येथेही मावळातील फुलांना चांगली मागणी आहे.
पवना फूल उत्पादक संघ, सोयक्स फुलोरा, एस्सार अॅग्रोटेक, सुजल अॅग्रो, साई रोजेस, प्रबोधन फ्लॉवर्स, रुजुल अॅब्रो, जय अंबे, इंडिका फ्रेश, लेक व्हॅली, समृद्धी, ऑरियन एक्सपोर्ट, ग्लोबल अॅग्रोटेक, विक्रम ग्रिनटेक आदी कंपन्यांकडून निर्यात सुरू आहे.
मावळ तालुक्यातील वातावरण या वर्षी गुलाब फुलांच्या उत्पादनासाठी पोषक राहिल्याने मोठय़ा प्रमाणात फुलांचे उत्पादन झाले. तसेच रोगांचा प्रभाव देखील कमी राहिला. मात्र विदेशी बाजारपेठेसह स्थानिक बाजारपेठेची मागणी काही प्रमाणात कमी राहिल्याने फुलांना विदेशी बाजारपेठेत सरासरी बारा ते पंधरा रुपये तर स्थानिक बाजारपेठेमध्ये सरासरी पाच ते सात रुपये असा भाव यंदा मिळाला. दरवर्षी पॉलिहाउस व फूल उत्पादनाचा खर्च वाढत असला, तरी त्या प्रमाणात बाजारभाव मिळत नाही, असे सांगून ठाकर म्हणाले, की ३० एप्रिल २०१६ पासून शासनाने पॉलिहाउसला दिले जाणारे अनुदान बंद केले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ते अनुदान लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी आहे.
पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव आणि मुकुंद ठाकर या पाच शेतकऱ्यांनी एकत्र येत पॉलिहाउस मधील उत्पादने विदेशी बाजारपेठेत विक्री करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून त्या माध्यमातून सध्या विदेशी बाजारपेठेत दर दिवशी दीडशे बॉक्स फुले जात आहेत. गुलाबफुलांना १४ फेब्रुवारी रोजी जगभरात मागणी असली, तरी फुलांचे उत्पादन वर्षभर सुरू असते. दर आठवडय़ाला सर्व शेतकरी एकत्र येत कामाचा आढावा घेतात. प्रत्येकाच्या पॉलिहाउस मध्ये जाऊन कामासोबत औषधे फवारणी तसेच उत्पादन वाढीसाठी विविध प्रकारे कामे केली जात असल्याचे मुकुंद ठाकर यांनी सांगितले.
source
Comments
Post a Comment