निश्चलनीकरणाचा फटका बसून मुंबईतील अनेक देवस्थानांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय घट झाली होती.
कार्ड, इंटरनेट, डिजिटल वॉलेटद्वारे देणगी सुविधा
निश्चलनीकरणानंतर रोखविरहित मार्गाचा अवलंब करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनीही आता मुंबईतील प्रमुख देवस्थानांना ‘कॅशलेस’ व्यवहारांमार्फत दान देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देवस्थानांची ऑनलाइन मार्गाने होणारी व्यवहारांची टक्केवारी वाढली आहे. दुसरीकडे ज्या देवस्थानांकडे या सुविधा उपलब्ध नाहीत त्यांचे निश्चलनीकरणानंतर कमी झालेले उत्पन्न अद्याप वाढलेले नाही.
निश्चलनीकरणाचा फटका बसून मुंबईतील अनेक देवस्थानांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय घट झाली होती. परंतु भाविकांनी दानपेटीत रोख टाकण्याऐवजी ऑनलाइन किंवा अॅपआधारित मार्गाने दान करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सिद्धिविनायकासारख्या प्रसिद्ध मंदिरांमधील ऑनलाइन मार्गाने होणारे व्यवहार वाढले आहेत. सिद्धिविनायक मंदिरात नियमित होणारे अभिषेक आणि पूजेसाठी आकारण्यात येणारे शुल्क ऑनलाइन मार्गाने भरणाऱ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातील ऑनलाइन मार्गाने झालेल्या व्यवहारांपेक्षा यंदा यात ३०५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाटील यांनी सांगितले. नवीन वर्षांत पहिल्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढीव संख्या लक्षात घेता यंदा मंदिर प्रशासनाकडून ‘पेटीएम’, ‘फ्रीचार्ज’ यांसारख्या ‘अॅप’च्या माध्यमातून देणगी भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. मुंबादेवी मंदिर मात्र अपवाद ठरले आहे.
मुंबादेवीच्या देणग्यांत घट
सिद्धिविनायक मंदिराच्या ऑनलाइन व्यवहारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र असताना मुंबादेवी मंदिरात उलटे चित्र आहे. मंदिराच्या साप्ताहिक उत्पन्नात ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. मात्र मंदिराचे उत्पन्न ३५ टक्क्यांनी कमीच राहिले. ‘चलनबंदीला दोन महिने होत आले तरीही परिस्थिती बदललेली नाही. आठवडय़ाला प्रशासनाकडे साधारण सहा लाखांची रक्कम जमत असे. आता ती साडेतीन ते चार लाखांवर आली आहे,’ असे मंदिराचे व्यवस्थापक हेमंत जाधव यांनी सांगितले.
source
Comments
Post a Comment